–गणेश सुळ
केडगाव : तुम्ही ट्रेकिंगसाठी निघालात की काय काय घेता..? डिकथलान मधून चांगल्या प्रतीचे शूज, ट्रेकिंग पैंट्स, स्टीक, इ. घेता. गडकोटांचा रस्ता सोपा नसतो. कधी खडी चढण तर कधी सरळसोट वाट, कधी निसरडा तर कधी खाचखळग्यांचा..काट्याकुट्यांचा रस्ता….अशा दुर्गम वाटेवरुन शूज घालून चालणं म्हणजे अत्यंत अवघड काम….पण याच वाटेवरुन तुम्हाला अनवाणी चालायला लागलं तर…? कदाचित नाहीच जमणार..! पण वाघोलीतील एका शिवप्रेमीने ही किमया करुन दाखवलीय, होय…त्याने एक नाही, दोन नाही तर तब्बल दोनशे किल्ले सर केलेत. तेही अनवाणी पायाने…एका शिवसंकल्पाने बांधले गेलेले नामदेव गवळी कधीही चप्पल, बूट, घालत नाहीत. गेली चार वर्ष ते अनवाणी पायाने वावरतात. गडकोटांवरही अनवाणीच जातात.
वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात सतत कार्यमग्न असतातच पण ते कट्टर शिवप्रेमी आणि गडप्रेमी आहेत. त्यांनी आतापर्यंत 200 किल्ले सर केले आहेत. दर रविवारी ते वेगवेगळ्या गडांवर जातात. रायगड त्यांचा दोनशेवा किल्ला होता. हा पल्ला गाठल्याबद्दल रायगडावर शिवप्रेमींकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पोस्टमन गवळी हे वाघोली येथे पोस्टमन म्हणून काम करतात. आपल्याला शिवरायांचे विचार आत्मसात करायचे असतील तर गडकिल्ले जरुर पाहावेत. हे गडकोट आपल्याला शिवरायांच्या भव्यतेची, दिव्यतेची आठवण करुन देतात. ट्रेकिंगने आरोग्य तर सुधारतेच पण शिवविचारांनी मानसिक आरोग्यही सुदृढ होते, असे पोस्टमन गवळी म्हणाले. त्यांनी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर येथील सर्व गड पाहिले आहेत. तर नाशिक, कोकण, मराठवाडा येथील बहुतांश किल्ले पाहिले आहेत.