पुणे : ऑनलाईन मैत्री करून फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घोरपडी गाव येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता. ६) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन चेतन चंदर मुट्टल (वय-२२, रा. मुत्तलवाडी, पाटण, जि. सातारा)
याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१६ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत वानवडी, लोणावळा, वडकी, हडपसर, कोरेगाव पार्क येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील चेतन मुट्टल याने पुण्यातील घोरपडी गावात राहणाऱ्या मुलीसोबत २०१६ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, विवाह करण्याची वेळ आल्यावर आरोपीने विवाहास ठाम नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.