पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने शाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार १६ जून ते ३० जून या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थिनी आणि ताब्यात घेतलेले दोन विद्यार्थी हे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. तर ताब्यात घेतलेला एक जण हा शाळा सोडून गेला असला तरी सुद्धा इतर मित्रांच्या संपर्कात होता अशी माहिती मिळत आहे. या अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींचे फोटो टेलिग्रामवरून अपलोड करून मोर्फ करत न्यूड केले.
दरम्यान, मॉर्फ केलेले हे फोटो शाळा सोडून गेलेल्या आपल्या तिसऱ्या मित्रांना पाठवले. हा संपूर्ण प्रकार जेव्हा शाळेतील शिक्षकांना समजला. तेव्हा त्यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांना बोलावून या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून तीनही मुलांना ताब्यात घेतले आहे. या सर्व मुलांना आज बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.