पुणे : आज रक्षाबंधन सण आहे. देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीला खास भेटवस्तू देत असतात. अशीच भेटवस्तू पुण्यातील रिक्षाचालक बहिणींना देणार आहे.
रक्षाबंधनसाठी पुण्यात प्रवास करणाऱ्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही आज पुणे रेल्वे स्थानकात उतरताय आणि पुढे प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुमचा प्रवास आज मोफत होऊ शकतो. जवळच्या भाड्यासाठी तुमच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. दूरच्या प्रवासात एकूण भाड्यात तुम्हाला 100 रुपयांचे मोठे डिस्काऊंट मिळणार आहे.
आज रक्षाबंधननिमित्त सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बुथ वरुन प्रवास करणा-या महिला प्रवाशांना 100 रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जात असून त्यापुढे भाडे झाल्यास एकूण भाड्यातून 100 रुपयेची सूट देण्यात येणार आहे. या ठिकाणी शहरातील आतापर्यंत 800 रिक्षा पुणे स्टेशनवरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे. या सर्व रिक्षातून महिलांना फायदा मिळणार आहे.
रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रिक्षा चालकाने मोठा निर्णय घेतलाय. पुण्यात आपल्या भावांना किंवा परिवाराला भेटण्यास जाणाऱ्या बहिणींना रिक्षाचालक बांधवातर्फे महिला प्रवाशांना ही खास ऑफर आणण्यात आली आहे. महिला प्रवाशांनी या मोफत रिक्षा प्रवास सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिक्षा संघटनांनी केला आहे.