दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुका आरोग्य विभागामार्फत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र साठेनगर तसेच शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सोनाईनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये ४०० पेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळाला असल्याची माहिती डॉ. हनुमंत शिंदे यांनी दिली.
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे लाखो वारकऱ्यांसह इंदापूर येथे आगमन झाले होते. त्याप्रसंगी विठ्ठल भक्तांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी इंदापूर तालुका आरोग्य विभागामार्फत अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र साठेनगर तसेच शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सोनाईनगर याठिकाणी ही आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना डॉ. हनुमंत शिंदे म्हणाले, विठू भक्तांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या सेवेची पावती” आहे. या शिबीर आयोजनामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रृत शहा यांच्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे आभार डॉ. शिंदे यांनी मानले.
या शिबिर आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत शिंदे यांसह आरोग्य सेविका आयेशा तांबोळी, प्रणिता भोसले तसेच प्रियंका सरवदे, अभय मोरे, संतोष लोखंडे यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करून वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम केले.