संतोष पवार
पुणे : वाहन चालकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. वाहन चालकांच्या वाहन चालवण्याच्या कौशल्यामध्ये त्यांच्या दृष्टीस व शारीरिक आरोग्यास अनन्यसाधारण महत्त्व असून त्याकरिता वाहन चालकांच्या नेत्रतपासणीसाठी राबविण्यात येणारे आरोग्य शिबिर हा आदर्श उपक्रम असल्याचे मत इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी व्यक्त केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पुणे सोलापूर महामार्गावर (NH 65) इंदापूर (सरडेवाडी) टोल प्लाझा येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्यावतीने वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरावेळी बोलताना महेश कुरेवाड म्हणाले की वाहनचालकांनी आपल्या डोळ्यांची काळजी व निगा राखणे गरजेचे आहे. रस्ते अपघाताची समस्या लक्षात घेता वाहनचालकांनी रस्ते वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
वाहन चालकांनी आपल्या डोळ्यांची नियमितपणे तपासणी करून त्यावर योग्यवेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान महामार्ग प्राधिकरण आयोजित या आरोग्य शिबिरात वाहन चालकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली . डोळ्यांचे विकार दृष्टिदोष याबाबत उपाययोजना सांगण्यात आल्या. तसेच वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मन्जुर शेख, इंदापूर महामार्ग पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, इंदापूर टोल प्लाझाचे अधिकारी सतिश चव्हाण, नितिन शिंदे आदिंसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.