पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरातील एका महिलेला गिफ्ट पाठवण्याच्या आमिषाने तब्बल १३ लाख २० हजार रुपायची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेहून डॉलर आणि सोने पाठवण्याचे आमिष दाखवून महिलेकडून १३ लाख २० हजार रुपयेउकळण्यात आले. ही घटना जुलै २०२३ ते आजपर्यंत धनकवडी येथे ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.
याप्रकरणी आंबेगाव पठार, धनकवडी येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने रविवारी २५ फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून डॉ. मार्क बक्शी वेगवेगळ्या बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना आरोपी याने महिलेच्या मोबाईलवर फोन केला. तसेच व्हॉट्सअॅपवर संपर्क करुन ओळख निर्माण केली. आरोपीने महिलेसाठी गिफ्ट पार्सल म्हणून अमेरिकन डॉलर आणि सोने पाठवण्याचे आमिष दाखवले. दरम्यान, गिफ्ट पार्सल प्राप्त करण्यासाठी कस्टम ड्युटी, मनी लॉड्रींग फी, डॉलर कन्व्हर्जन टू इंडियन करन्सी फि तसेच टॅक्स भरण्यास सांगितले.
आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादी यांना १३ लाख २० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात भरण्यास भाग पाडले. मात्र, आरोपी डॉ. मार्क बक्शी ने आपली आर्थिक फसवणूक केल्याचं लक्षात येताच पोलीस स्टेशन गाठले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे करीत आहेत.