पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्यात घडला आहे. संबंधित अधिकाऱ्याला अपघातामुळे दिव्यांगत्व आले आहे. अशा परिस्थितीतही पोलिस त्याला सहकार्य करत नसून, आरोपींऐवजी त्यांनाच अरेरावी केली जात असल्याचा आरोप अधिकाऱ्याने केला आहे. जावेद इनामदार असं सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी इनामदार यांनी परिमंडळाच्या उपायुक्तांसह विभागीय पोलिस, तसेच प्राधिकरणाकडेही तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोंढवा परिसरात सेवानिवृत्त अधिकारी इनामदार राहत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने इनामदार यांची दोघांनी ६ लाख रुपयांची फसवणूक केली. इनामदार हे राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागात वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झाले आहेत. ते कर्तव्यावर असताना काही वर्षांपूर्वी रस्ते अपघातात त्यांना अपंगत्व आले आहे.
सेवानिवृत्तीनंतर इनामदार यांना भविष्यनिर्वाहनिधी किंवा अन्य माध्यमातून मिळालेले पैसे त्यांनी दोन व्यक्तींकडे गुंतवले होते. एकाकडे २ लाख, तर दुसऱ्याकडे ४ लाख गुंतवले आहेत. मात्र, त्यांना गुंतवणुकीवरील नफा किंवा मुद्दल परत मिळाली नाही. त्यामुळे इनामदार यांनी २२ डिसेंबर २०२३ या दिवशी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
कोंढवा पोलिसांनी तक्रार अर्जावर कार्यवाही करताना सुरुवातील तक्रारदार किंवा आरोपींचा जबाब घेतला नाही. त्यामुळे इनामदार यांनी तपास अधिकारी बदलून मिळण्याची मागणी वरिष्ठ पोलिसांकडे केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये जबाब नोंदवून घेतला, मात्र जबाबाची प्रत दिली नाही. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला असता, चांगली वागणूक देण्यात आली नाही, असा आरोप इनामदार यांनी केला आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे म्हणाले की, संबंधित तक्रारदारकडून तक्रर अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे आहे, असं त्यांना सांगण्यात आले. त्यांना मदत करण्याच्या भावनेने आम्ही फसवणूक करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. तक्रारदार व आरोपींना समोरासमोर बसवून त्यांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वस्त केल्याचे सोनवणे यांनी यावेळी सांगितले.