पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) नावाखाली सायबर चोरट्यांनी पुणेकरांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. हे सायबर चोरटे नागरिकांना कॉल किंवा मेसेज करून मोबाईलवर लिंक डाउनलोड करण्यास सांगतात. लिंक डाउनलोड केल्यानंतर पैसे न भरल्यास तुमचा गॅस पुरवठा खंडित केला जाईल, अशी धमकी देऊन पैसे उकळत आहेत. ए
मएनजीएलच्या इशाऱ्यांनंतरही अनेक ग्राहक या सायबर चोरांना बळी पडत आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत ग्राहकांना 15.23 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. तर याप्रकरणी डेक्कन, सहकारनगर, येरवडा पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी मंजिरी अनिरुद्ध देशमुख (वय-५८, मालती माधव अपार्टमेंट, भांडारकर रोड, पुणे ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिलिंद अनंतराव हमणे (वय-६२, रा. गंगातीर्थ सोसायटी, अरण्येश्वर, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीपकुमार श्रीनारायण त्रिपाठी (वय-६७, रा. हरिगंगा सोसायटी, फुलेनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत, फिर्यादी देशमुख यांना सायबर चोरट्याने ऑनलाइन आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. मागील महिन्याचे एमएनजीएल बिल थकीत असल्याचे सांगितले. तसेच बिल न भरल्यास त्यांचे गॅस कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा सायबर चोरट्यांनी दिला.
देशमुख यांना गॅस कनेक्शनबाबत अपडेट देण्याच्या बहाण्याने अनेक मेसेज आले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती काढून घेतली. आणि फिर्यादी यांची ६ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेत, दिर्यादी मिलिंद हमणे यांना चोरट्यांनी एमएनजीएलचे असल्याचे भासवून फोन केला आणि त्याचे गॅस बिल थकीत असल्याची माहिती दिली. बिल न भरल्यास गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी दिली आणि ॲप डाउनलोड करण्याची खोटी सूचना दिली. हमणे यांनी ॲप डाउनलोड केले, ज्यामुळे चोरट्यांना फिर्यादी हमणे यांच्या मोबाइल फोनवर नियंत्रण मिळवता आले. चोरट्यांनी फिर्यादी यांचे ऑनलाइन बँकिंग ॲप वापरून त्यांच्या खात्यातून सुमारे ६ लाख रुपये काढले.
तिसऱ्या घटनेत, सायबर चोरट्यांनी त्रिपाठी यांच्याशी फोन आणि ऑनलाइन संपर्क साधला. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या गॅस कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तुमचे कनेक्शन अद्ययावत करणे आवश्यक आहे. असे सायबर चोरट्यांनी फिर्यादी त्रिपाठी यांना सांगितले. व त्रिपाठी यांच्याकडून कॅनरा बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती घेण्यात आली. आणि चोरट्यांनी त्रिपाठी यांची १ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केली.
चौथ्या घटनेत, मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या 72 वर्षीय वृद्धाशी सायबर चोरट्यांनी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. चोरट्यांनी एमएनजीएलच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले. व गॅस बिल अपडेट केले गेले नाही आणि बिल अपडेट करण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची सूचना दिली. या ॲपद्वारे चोरट्यांनी त्याच्या एटीएम कार्डची माहिती मिळवली आणि फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 1 लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली.
एमएनजीएलने ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे बिल भरण्याची किंवा अपडेट करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. ग्राहकांनी अशा फसव्या कॉलवर विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीला बनावट कॉल्स आणि मेसेजच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून या घोटाळ्यांना बळी पडू नये. तसेच याप्रकरणी एमएनजीएलने पोलिस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.
आनंद जैन (बिलिंग विभागाचे प्रमुख – एमएनजीएल)
एमएनजीएलच्या नावाने खंडणी मागितल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. “ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी यांची माहिती मोबाईल कंपन्यांकडून मागवली जात आहे. याव्यतिरिक्त, बँकांना फसव्या रकमा जमा केलेल्या खात्यांचे केवायसी तपशील प्रदान करण्यास सांगितले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सुरेश शिंदे (वरिष्ठ निरीक्षक -सायबर पोलीस ठाणे)
सायबर चोरट्यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमधूनच ग्राहकांची गोपनीय माहिती काढून घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सर्व माहिती बरोबर देत आहेत. मलाही त्यांचा फोन आला होता. त्यांनी मलाही फसवणूक करण्यासाठी जाळे रचले होते. परंतु, माझ्याकडे ॲपलचा फोन असल्याने ते ॲप्लिकेशन डाऊनलोड झाले नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्या पत्नीच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामुळे फसवणुकीच्या शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. व सुदैवाने माझी लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक टळली.
तुकाराम उरमोडे (ग्राहक- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड)