पुणे : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज मिळवून देतो, असे सांगून पाच जणांकडून दोन लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्वेनगर येथील प्रतिज्ञा हॉलजवळ मार्च २०२३ ते आजपर्यंत हा प्रकार घडला. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत सोनाली संतोष लोंढे (वय २६, रा. कर्वेनगर) यांनी रविवारी (ता. १४) अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शांताराम मारुती शिर्के (वय- ५१, रा. १३०, दांडेकर पूल, गणपती मंदिराजवळ, दत्तवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेतून फिर्यादी व इतर चार जणांना व्यवसायासाठी कर्ज हवे होते. आरोपीने फिर्यादी व इतर चार जणांना मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज काढून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. एवढेच नव्हे तर कर्ज काढून देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी व इतरांकडून २ लाख ४० हजार रुपये घेतले.
दरम्यान, पैसे देऊनही कर्ज न मिळाल्याने फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली. मात्र, आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी अलंकार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.