पुणे : मी विधान भवनात कामाला असून, लष्करातील बड्या अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे. मी तुला लष्करात नोकरी मिळवून देऊ शकतो, असे आमिष दाखवून, लष्करात नोकरी मिळाल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन एकाची तब्बल साडेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. आरोपीने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गणेश बाबुलाल परदेशी (रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कोंढव्यातील एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. कोंढवा परिसरात फिर्यादीचे दुकान आहे. आरोपी गणेश परदेशी हा त्यांच्या दुकानात जात असल्याने दोघांची ओळख झाली.
गोड बोलून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपण विधान भवनात कामाला असल्याची बतावणी त्याने फिर्यादीकडे केली. लष्करातील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून फिर्यादीच्या दोन मुलींना लष्करात कायमस्वरुपी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. दरम्यान, गोड बोलून पैसे उकळण्याच्या आमिषाने परदेशी याने मुलींना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी पाच लाख रुपये ऑनलाइन, तसेच रोख पद्धतीने परदेशीला दिले.
दरम्यान, फिर्यादीने देखील आश्वासनांना भुलून ओळखीतील इतरांना लष्करात नोकरीचे आमिष दाखविले आणि त्यांच्याकडूनही पैसे घेतले. परदेशीने त्यांना गॅरिसन इंजिनिअरिंगचे बनावट नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर फिर्यादीने चौकशी केली असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. परदेशीने आणखी काहीजणांची फसवणूक केली असून, आतापर्यंत नोकरीच्या आमिषाने आठ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.