पुणे : जागा विकसीत करण्यासाठी गुंतवणूक केल्यास करोडो रुपयांचा फायदा करुन देतो, असे आमिष दाखवून एक कोटी ११ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार २००८ ते आजपर्यंत जंगली महाराज रोडवरील एका हॉटेलमध्ये घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्रताप बाळासाहेब ढमाले (वय-४८, रा. भेलकेनगर समोर, कोथरुड) यांनी गुरुवारी (ता. ११) फिर्याद दिली आहे. यावरुन अण्णा तुकाराम लष्करे (वय-५७), अनिल सर्जेराव पवळ (वय-४७, रा. बराटे बिल्डींग, तपोधाम सोसायटी, वारजे, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लष्करे आणि पवळ यांनी फिर्यादी यांना अहमदनगर येथील एक जागा विकसीत करण्यासाठी गुंतवणूक केल्यास अनेक पटीने करोडो रुपयांचा फायदा करुन देतो, असे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना वेळोवेळी चेक व रोख असे एकूण १ कोटी ११ लाख ४५ हजार रुपये दिले. मात्र, आरोपींनी जागा विकसीत न केल्याने फिर्यादींनी पैसे मागितले.
दरम्यान, त्यावेळी अनील पवळ याने दोन चेक फिर्यादी यांना दिले. फिर्यादी प्रताप ढमाले चेक बँकेत वटवण्यासाठी गेले असता आरोपींनी बँकेतून पेमेंट स्टॉप केल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांनी दिली. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. आर्थिक फसवणूक झाल्याने प्रताप ढमाले यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली.