पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रु भागातील सहा मजली इमारत खरेदी करून देण्याच्या आमिषाने एका डॉक्टरला १ कोटी ३० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. राहुल भारत पाटील (वय-३८, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार जयप्रकाश मुळे (रा. हडपसर), कवरपालसिंग पलिंदरसिंग बेदी (रा. कोरेगाव पार्क), संदीप दुबे (रा. कात्रज) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. राहुल पाटील हे व्यवसायाने ऑर्थोपेडीक डॉक्टर आहेत. त्यांचे टेंभुर्णी येथे पाटील अॅक्सिडेंट, आयसीयू आणि ऑर्थोपेडीक सेंटर या नावाने हॉस्पिटल आहे. त्यांना कोरेगाव पार्क परिसरात घर घ्यायचे होते. त्याबाबत ते वेगवेगळ्या पद्धतीने या भागात घर मिळते का याची माहिती घेत होते. तेव्हा त्यांची आरोपी जयप्रकाश मुळे यांच्याशी ओळख झाली.
त्या ओळखीतून मुळे याने डॉ. पाटील यांची कवरपालसिंग बेदी याच्याशी ओळख करून दिली. तसेच बेदींच्या मालकीची नॉर्थमेन रस्ता कोरेगाव पार्क येथील पी. एम. बेदी हाऊस ही इमारत विकायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. पाटील यांनी अॅडव्हान्स म्हणून १ कोटी ३० लाख रुपये बेदी यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केले.
मात्र, आरोपींनी ठरल्याप्रमाणे त्यांना ही इमारत न विकता तसेच करारनामा न करता इमारत परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकली. तसेच पाटील यांनी दिलेली १ कोटी ३० लाखांची ऍडव्हान्स रक्कम परत न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास कोरेगाव पोलीस करत आहेत.