पुणे : मयत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन फ्लॅटची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा खुर्द येथे समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यक्तीची आरोपींकडून सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शालीमार हिल पार्क येथे सन 2022 ते 9 जून 2024 या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी श्रीकांत जयवंत पाटील (वय-57 रा. प्रिस्टीन कॉन्स्टलेशन, औध, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन लता भीमशा शेट्टी (रा. लोहार गल्ली जवळ, शात्री चौक, शाहदाबाद ग्रामीण कलबुर्गी, कर्नाटक), जकिअनवर मुल्ला (रा. परमार भवन, कोंढवा रोड, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे काका स्व. विजय पाटील यांच्या नावाने शालीमार हिल पार्क मधील एल बिल्डींगमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत एक कोटी 25 लाख रुपये आहे. आरोपी लता शेट्टी हिने बनावट कागदपत्राच्या आधारे बक्षीसपत्र तयार करुन घेतले होते. या बनावट कागदपत्राच्या आधारे आरोपी जकिअनवर मुल्ला यांना फिर्यादी यांच्या काकाच्या मालकीचा फ्लॅट विकला. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या काकाच्या फ्लॅटची बनावट कागदपत्राच्या आधारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.