पुणे : कमी भावामध्ये हिऱ्यांचा नेकलेस आणि हिऱ्यांच्या बांगड्या देतो असे आमिष दाखवत तसेच पेठे ज्वेलर्स फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यावसायिकाची तब्बल ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात पेठे ज्वेलर्सचे मालक पराग चंद्रकांत पेठे (रा. कपिल वास्तू, कर्वेनगर) तनय पराग पेठे (रा. सहवास सोसायटी, कर्वेनगर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान 406, 420,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. हा सर्व प्रकार आयडियल कॉलनी मधील चित्रलेखा चेंबर्स मध्ये असलेल्या पेठे ज्वेलर्स या दुकानात 2017 ते 2024 या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी विनोद देवेंद्र विनोद चंद्र शहा (वय 49, रा. पर्वती दर्शन) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांननी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पराग पेठे यांचा आधीपासून परिचय आहे. पेठे ज्वेलर्स या दुकानात फिर्यादी यांना पराग व तनय या दोघांनी कमी भावामध्ये हिऱ्याचा नेकलेस आणि हिऱ्याच्या बांगड्या देतो असे आमिष दाखवले. तसेच पेठे यांनी पेठे ज्वेलर्स या फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सुद्धा सांगितले.
आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे 35 लाख रुपये आणि रोख 25 लाख रुपये अशा 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली. या करारात ठरल्याप्रमाणे पेठे यांनी फिर्यादी शहा यांना हिऱ्याचा नेकलेस आणि हिऱ्याच्या बांगड्या अजूनपर्यंत दिलेल्या नाहीत.
फिर्यादी यांनी खूप वेळा पराग यांच्याकडे त्या संदर्भात मागणी केली प[परंतु त्यानं प्रतिसाद मिळाला नाही. पेठे यांनी त्यांना वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी पराग यांना भेटून नेकलेस आणि बांगड्या यांच्यासाठी घेतलेले 60 लाख रुपये परत देण्याची मागणी केली. त्यावेळी परागपेटी यांनी त्यांना दहा लाख रुपये परत दिले.
मात्र राहिलेली रक्कम लवकरच देतो असे आश्वासन पेठे यांनी फिर्यादीला दिले होते. मात्र, अद्याप पर्यंत त्यांनी शिल्लक 50 लाख रुपये परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलिस करीत आहेत.