लोणी काळभोर : जर तुम्ही कोणाची चेष्टा, मस्करी करत असाल, तर आताच सावध व्हा. अन्यथा तुम्ही केलेली चेष्टा, मस्करी एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. असाच एक प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात घडला आहे. ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. भीती दाखविण्याच्या नादात 4 वर्षांची चिमुकली उकळल्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कवडी माळवाडी परिसरात 23 मार्चला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आराध्या रोहित पांचाळ (वय-4, रा. कवडीमाळवाडी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिच्यावर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून ती 40 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पांचाळ हे कदमवाकवस्ती परिसरात इलेक्ट्रिकलची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पांचाळ हे कुटुंबासोबत कवडी माळवाडी परिसरात राहतात. पांचाळ यांना आराध्या नावाची मुलगी आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पांचाळ यांच्या पत्नीने वेफर्स बनवण्याचा 23 मार्चला बेत आखला होता. बटाट्याचे वेफर्स बनविण्यासाठी गरम पाणी केले होते. हे उकळलेले पाणी गॅसवरून खाली उतरून ठेवले होते. दरम्यान, पांचाळ यांच्या घराशेजारचा 14 वर्षाचा मुलगा आणि आराध्या हे दोघे खेळत होते. तेव्हा मुलाने आराध्याला उचलून पाण्यात टाकतो, अशी भीती दाखवली. त्यानंतर मुलाकडून आराध्या उकळत्या पाण्यात पडली. त्यावेळी तिने मोठमोठ्याने आरडाओरडा केला.
आवाज ऐकून आराध्याचे नातेवाईक त्याठिकाणी ताबडतोब आले. त्यांनी आराध्याला गरम पाण्यातून त्वरित बाहेर काढले व उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आराध्यावर उपचार सुरु झाल्यापासून सुमारे तीन ते चार दिवस ती बेशुद्ध असवस्थेत होती.
दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी आराध्या शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घराशेजारच्या 14 वर्षांच्या दादाने खेळताना भीती दाखवून पाण्यात टाकतो, असे म्हणाला होता. त्याच्या हातातून सटकून मी पाण्यात पडली, अशी माहिती आराध्याने तिच्या आई-वडिलांना दिली. ही माहिती समजताच आराध्याचे वडील रोहित पांचाळ यांनी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले व घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.