शिक्रापूर : जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे दिराच्या लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अज्ञात दुचाकीस्वारांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत दोन अज्ञात दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केला.
सुजाता धनंजय मासळकर (वय ५३, रा. मोशी प्राधिकरण, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. जातेगाव खुर्द येथील सुजाता मासळकर या काही कामाच्या निमित्ताने सध्या मोशी येथे राहण्यास असून त्यांच्या दिराचे लग्न असल्याने २७ जून रोजी सुजाता या गावी आल्या होत्या. दुपारच्या सुमारास सुजाता या वाहनातून उतरून घराकडे जात असताना पाठीमागून दोन दुचाकीस्वार आले.
ते काही अंतर पुढे जाऊन पुन्हा मागे वळून आले. दरम्यान, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने सुजाता यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून दोघे जण पळून गेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहेत.