-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन एका व्यक्तीस कारमध्ये बसवून अपहरण करुन त्याचे महिलेसोबत फोटो काढले. तसेच ते फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यानंतर मारहाण करुन सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम घेतले. नातेवाईकांकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे मागवून घेऊन इसमाची चार लाख सत्तर हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
याबाबत संदीप जिजाबा ताठे (रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे ) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत राहुल सुखदेव गायकवाड (वय 34 वर्षे रा. कोकडी ता. पारनेर जि. अहमदनगर), विकास प्रकाश थिटे (वय 26 वर्षे रा. चौधरी वस्ती पाबळ ता. शिरुर जि. पुणे), अर्चना अविनाश पठारे (वय 34 वर्षे रा. जवळा ता. पारनेर जि. अहमदनगर), समीर प्रकाश शेलार (वय 21 रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या चौघांनाही अटक केली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे, निमोणे (ता. शिरुर) येथील संदीप ताठे यांना 8 सप्टेंबर रोजी अर्चना पठारे या महिलेने फोन करुन तुम्ही पैशाची मदत करु शकता का? असे विचारले असता, त्यावेळी ताठे यांनी माझ्याकडे पैसे नाही सांगत फोन कट केला, त्यांनतर दोन दिवसांनी महिलेने फोन करुन माझे वाघोलीत घर आहे ते घ्या आणि मला पाच लाख रुपये द्या, असे म्हणून वारंवार फोन करण्यास सुरुवात केल्याने ताठे महिलेचा फोन टाळू लागले. त्यांनतर 11 सप्टेंबर रोजी ताठे पुण्याला जाणार असताना अर्चना यांनी फोन करुन सणसवाडी येथील एल एन टी फाट्या जवळ असल्याचे सांगून ताठे यांना बोलावले.
यावेळी ताठे त्यांच्या कार मधून गेले असताना अर्चना यांच्यासह राहुल गायकवाड, विकास थिटे हे कार जवळ आले, त्यांनी संदीप यांना कारमध्ये बसवून वाघोली येथील एका ठिकाणी घेऊन जाऊन अर्चना पठारे सोबत संदीप ताठे यांचे फोटो काढून घेत फोटो व्हायरल करण्याची तसेच तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देऊन मारहाण करत संदीप यांच्या नातेवाइकांना कडून फोन करुन ऑनलाईन पैसे मागवून घेऊन संदीप यांची तब्बल चार लाख सत्तर हजार रुपयांची लुट करत पुन्हा सणसवाडी येथे आणून सोडून देत पोलिसांत गेला तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली,
याबाबत संदीप ताठे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने वरील महिलेच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी तीनही आरोपींना अटक केली, मात्र याबाबत तपास करत असताना निमोणे गावातील समीर शेलार यानेच आपल्या गावातील संदीप ताठे याच्याकडे पैसे व सोने असल्याचे सांगून लुटण्यास सांगितल्याचे समोर आल्याने पोलिसांनी समिर प्रकाश शेलार (वय 21 रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) याला देखील अटक केली, आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.
याबाबत संदीप जिजाबा ताठे हे शेतकरी असून खरेदी विक्री व्यवसाय करतात याच्याकडे रोख 50 हजार रुपये, त्याच्या आय डी एफ सी बँकेतून 9 हजार रुपये, ऑनलाईन फिर्यादीच्या दाजी कडून 35, हजार रुपये, बहिणीकडून 15 हजार, मावस भाऊ यांच्याकडून 40 हजार रुपये, सोन्याची चार तोळे चैन, 1 लाख 60 हजार रूपये, हातातील चार तोळ्यांच्या अंगठ्या 1 लाख 60 हजार रुपये असे एकूण 4 लाख 69 हजाराचा ऐवज घेतला ,