पुणे (Pune) : हडपसरमधील गाडीतळ परिसरात शनिवारी (दि. १९) रात्री रिक्षामध्ये प्रवासी भरण्याच्या वादातून चौघा जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये त्याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा भाऊही जबर जखमी झाला. यासंदर्भात दिनेश धनंजय राखपसरे (वय २४, रा. जय मल्हार कॉलनी, घुले वस्ती, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी विकास शेंडगे (वय २८, रा. कुंजीर वस्ती, मांजरी) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार राजा कुंभार ऊर्फ येडा राजा, बारक्या व तुषार यांच्याविरुद्धही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश राखपसरे याचा भाऊ यश राखपसरे हा रिक्षाचालक आहे. तो हडपसर ते मांजरी अशी प्रवासी वाहतूक करत असतो. भावाच्या रिक्षात प्रवासी भरण्यासाठी दिनेश राखपसरे मदत करत असतो. एक आठवड्यापूर्वी गाडीतळ येथे प्रवासी रिक्षात भरत असताना रिक्षा स्टँडवर रिक्षा चालविणारे विकास शेंडगे, तुषार यांच्याशी त्यांचे भांडण झाले होते. त्यानंतर, विकास व त्याच्या साथीदारांनी शनिवारी रात्री दिनेशवर चाकूचे वार केले. त्याचा चुलत भाऊ ओम यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला.