मंचर: मंचर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मंचर शहर व इतर ठिकाणी घरपोडी करणारे चार आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून १३ लाख २० हजार चारसे एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिली आहे..
माहिती देताना मांडवे म्हणाले, २ डिसेंबर २०२४ रोजी मंचर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीमध्ये तीन बंद सदनिका फोडून ३ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, ३ लाख ८० हजार रोख रक्कम अशी ७ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत लक्ष्मण दातखिळे यांनी मंचर पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी तपास पथकाची नेमणूक केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करत असताना सीसीटीव्ही, स्थानिक नागरिकाकडून माहिती आदी गोष्टींचा अवलंब करून आरोपी हे मध्य प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न केले.
मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी पुन्हा महाराष्टात आल्याचे लक्षात येताच त्यांच्याकडे असणाऱ्या स्विफ्ट वाहनातून (एम. एच. १३ ग्रेड. डी. ७८५६) ते नियमित प्रवास करत असल्याचे तपास पथकाला चोरट्यांचा माग काढत असताना लक्षात आले होते. त्यानुसार हे वाहन खेड मार्गे भीमाशंकर येथे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बंडगुजर व सहकाऱ्यांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले.
त्यामध्ये अलमसिंग इस्तो बामनिया (वय ३१), अवलसिंग रामेसिंग भुरीया (वय ५०), चमसिंग बदरू बामनिया (वय ३९), करणसिंग कालूसिंग भुरीया (वय ३८ रा. सर्वजण मध्यप्रदेश) यांनी मंचर येथील सहा त्याचबरोबर वडगाव मावळ, भोर, सासवड व पौड पोलीस स्टेशन अंतर्गत चार घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. या आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून १० दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.