माळेगाव (बारामती) : वडिलांसोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी धारदार शस्त्राने एक जणांवर खुनी हल्ला केल्याची घटना शिवनगर माळेगाव येथे घडली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून, माळेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना जेरबंद केले. प्रकाश दिंगबर भापकर (रा. अजिंक्यनगर, माळेगाव बु, ता. बारामती) असे जखमीचे नाव आहे. चेतन बाळू जाधव त्याचा मित्र मयूर रणजित जाधव, विजय बाळासो कुचेकर (सर्व, रा. माळेगाव, ता. बारामती), दिनेश आडके (रा. शिरवली, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश भापकर यांच्या गाडीला आडवे आले म्हणून बाळू जाधव यांच्यासोबत गेल्या दीड दोन महिन्यांपूर्वी किरकोळ वादावादी झाली होती. या घटनेमुळे बाळू जाधव यांचा मुलगा चेतन जाधव चिडला होता. त्याने आणि त्याचे मित्र मयूर जाधव, विजय कुचेकर, दिनेश आडके यांनी भापकर यांना धडा शिकविण्याचे ठरविले. भापकर हे मित्रासोबत एका ऑफिसमध्ये बसले होते.
त्यावेळी वरील आरोपींनी अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये प्रकाश भापकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचे मित्र दादा माने हे किरकोळ जखमी झाले. माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे ज्ञानेश्वर मोरे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत यांच्या पथकाने आरोपींना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर करत आहेत.