पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्या घरच्यांच्या संमतीने त्यांनी प्रेमविवाह केला. नवविवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून चारच महिन्याच्या आत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी विशाल साकोरे (वय-२२, रा. पाचवड केंदुर, ता. शिरुर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी बाळासाहेब दगडु दौंडकर (वय-५१, रा. कन्हेरसर ता़ खेड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विशाल बबन साकोरे (रा. पाचवड केंदुर, ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी साक्षी आणि विशाल यांचे खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबाच्या सामंजस्यातून त्यांचा १० मे २०२४ रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. तेव्हापासून साक्षी केंदुरमध्ये रहात होती. ती माहेरी आली तरी देखील विशाल तिला फोनवरुन शिवीगाळ करत असे. तसेच तिला रात्रीच माहेरुन सासरी घेऊन जात होता.
फिर्यादी यांनी तिला विचारले असता, तो कायम कामावरुन शिवीगाळ करीत असल्याचे साक्षी हिने सांगितले होते. विशाल याला साक्षीच्या वडिलांनी ५० हजार रुपयांची मदत केली होती. त्यानंतर विशालने एक महिन्यांपूर्वी शिक्रापूर येथील घराच्या बांधकामासाठी मदत म्हणून पैशांची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी तुमचे बांधकाम चालू झाल्यानंतर तुम्हाला मदत करेन, असे फिर्यादी यांनी सांगितले होते.
ई-सेवा केंद्र दुकानात साक्षी ही कामात नवीन असल्यामुळे तिला पूर्ण काम येत नव्हते. त्यामुळे विशाल तिला सतत शिवीगाळ करत असे. तिला मारायला धावणे आणि मारहाण करणे असे प्रकार वारंवार करुन तिला मानसिक त्रास देत होता. याबाबत साक्षीचे सासु सासरे यांनी दोघात होणार्या भांडणाबाबत फिर्यादी यांना कोणत्याही गोष्टीची कल्पना दिली नव्हती. तिचे सासु सासरे देखील तिला त्रास देत असल्याचा फिर्यादी यांना संशय आहे.
दरम्यान, विशाल याच्या त्रासाला कंटाळून साक्षी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी उघड झाली. त्यानंतर विशालने सकाळी ९ वाजता साक्षीच्या आईला फोन करुन साक्षी हिने गळफास घेतल्याचे आणि तिचा मृत्यु झाल्याचे न सांगता केवळ केंदुरच्या घरी या असे बोलून फोन कट केला. फिर्यादी हे त्यावेळी कामानिमित्त रांजणगाव एम.आय.डी.सी. मध्ये गेले होते. त्यामुळे ते लगेच केंदुरला पोहचू शकले नाहीत.
त्यानंतर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विशाल फोन करुन म्हणाला “तुम्ही सकाळी आले नाही, त्यामुळे तुमची मुलगी या जगात राहिली नाही,” असे सांगितले. फिर्यादी यांचे मेव्हणे पवन सुर्वे यांनी सांगितल्यानंतर त्यांना आपल्या मुलीचा मृत्यु झाल्याचे समजले आहे. साक्षी हिच्यावर अंत्यसंस्काराच्या वेळी तिचा पती किंवा तिच्या सासरचे कोणीही उपस्थित नव्हते. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.