कोंढवा : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या १५ फूट खड्ड्यात कपडे धुताना पाय घसरून चार अल्पवयीन मुली पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गगन उन्नती सोसायटीसमोर महाकाली मंदिराजवळ शनिवारी (ता. ८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने तीन मुलींना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. मुस्कान शिळावत (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. तर सरगम शिळावत (वय १५), सेजल शिळावत (वय १३), जानू शिळावत (वय १५) असे सुखरूप बचावलेल्या मुलींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी १५ फूट खड्डा खोदण्यात आला आहे. महाकाली मंदिराजवळ काही लोक तात्पुरत्या स्वरूपाच्या झोपड्या टाकून राहतात. त्यामुळे शेजारी असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात येथील महिला व मुली कपडे धुण्यासाठी जात असतात.
दरम्यान, कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुली खड्ड्यामध्ये पाय घसरून पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने अग्निशमन दल व पोलिसांना दिली. तोपर्यंत स्थानिकांनी तीन मुलींना बाहेर काढले होते. मात्र, एका मुलीला वाचविण्यात अपयश आले.
या घटनेची माहिती मिळताच, कोंढवा अग्निशामक दलाकडून ड्रायव्हर समीर तडवी, तांडेल दशरथ माळवदकर, फायरमन प्रकाश शेलार, अभिजीत धळकर, विश्वजीत वाघ हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशामक दलाने मुलीचे शोधकार्य केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चौथी मुलगी मुस्कान शिळावतला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.