पुणे : पुण्यातील येवलेवाडी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येवलेवाडी येथे माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काचेच्या कारखान्यात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी (ता. २९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अमित शिवशंकर कुमार (वय २७), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३), आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ वर्षे सर्व रा. धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी, कायमचा पत्ता : सलोन, रायबरेली उत्तर प्रदेश), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर जगतपाल संतराम सरोज (वय ४९ वर्षे, धंदा मजुरी, रा. धांडेकर नगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बू.) व मोनेश्वर (पूर्ण नाव माहित नाही) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे ‘इंडिया ग्लास सोल्युशन’ नावाने काचेचा मोठा कारखाना आहे. दरम्यान, रविवारी दुपारी काचेचा ट्रक कारखान्यावर आला होता. तो माल उतरवताना मोठे काचेचे स्लाईडला बांधण्यात आलेला बेल्ट तुटला आणि दोन मोठे काचेचे स्लाईड या मजुरांच्या अंगावर पडले. यामध्ये पाच कामगार अडकले, त्यांच्या अंगावरच काच पडल्याने काचेचे तुकडे अंगात घुसल्याने सहा कामगार गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच ही कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर चार कामगारांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.