उरुळी कांचन : बाईफचे कम्पाऊंड तोडून चार एकराच्या चाऱ्यावर ट्रॅक्टरने नांगर फिरविल्याची घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) जवळील टिळेकरवाडी हद्दीतील गट क्र. १४५ मध्ये घडली. ही घटना सोमवारी (ता.८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी मयुरेश मुकुंद कुलकर्णी (वय ४०, रा. स्म नं. बी ३. बायफ कॅम्पस, ऊरुळी कांचन ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अर्जुन गोपिचंद कादबाने (रा. सहजपुर, ता. दौड, जि. पुणे) याच्यावर गन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश कुलकर्णी हे बायक संस्था (भारतीय कृषी उदयोग प्रतिष्ठाण) ऊरुळी कांचन येथे सन २००९ पासून नोकरीस असून राज्य प्रशासकिय अधिकारी आहे. सदर संस्थेमध्ये कृत्रिम रेतन तयार करणे व संकरीत चारा संशोधन करण्याचे काम चालते. सदरचा चारा व रेतन ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर संपूर्ण भारतभर गोरगरीब शेतकऱ्यांना पुरविले जाते. त्याकरीता संस्थेमध्ये सर्व जातीचे संकरीत वळु पाळले जातात.
बायफ संस्थेचा संपूर्ण परिसर हा सुमारे १०० एकरचा असून, त्यापैकी बऱ्याच जागेमध्ये जनावराकरीता चारा पिकवला जातो. उरुळी कांचन, गट क्र. १४५ मधील चार एकर क्षेत्रात लुसण आरएल बहुवार्षिक ८८ जातीचे पीक डिसेंबर २०२२ मध्ये लागवड केले आहे. सदरचे क्षेत्राचे तीन बाजूने तारेचे कम्पाऊड व एका बाजूने भिंत आहे.
दरम्यान, फार्म मॅनेजर संदिप घोरपडे हे सोमवारी सकाळी बाईफ गेले असता त्यांना कम्पाऊंड तुटलेले आढळले. तसेच चार एकराच्या चाऱ्यावर ट्रॅक्टरने नांगर फिरविल्याचे दिसून आले. घोरपडे यांनी तत्काळ ही माहिती बाईफचे राज्य प्रशासकिय अधिकारी मयुरेश कुलकर्णी यांना दिली. कुलकर्णी खात्री करण्यासाठी गेले असता त्यांना पूर्व बाजूचे तारेचे कम्पाऊड तोडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करुन चार एकर लुसण पिकाचे लागवडीचे नुकसान केलेले दिसून आले.
याबाबत चौकशी केली असता सदरचा प्रकार हा अर्जुन कादबाने याने केला असल्याचे समोर आले. त्यानंतर कुलकर्णी यांनी अर्जुन कादबाने याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कादबाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे करत आहेत.