पुणे : आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील मालाडमध्ये एका महिलेला आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. या महिलेने ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचं आईस्क्रीम मागवलं होतं.
याबाबत अधिक माहिती अशी की, यम्मो आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्या प्रकरणी एफडीएने इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यम्मो कंपनी इंदापूर, गाजियाबाद आणि पुणे येथील कंपनी मधून आईस्क्रीम घेते. आईस्क्रीमध्ये बोट कुठल्या कंपनीतील आईस्क्रीमध्ये सापडलं आहे, ते अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. बोट कुठल्या आईस्क्रीममध्ये सापडलं आहे हे अद्याप माहिती नसलं तरी आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग बंद करण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासनाने दिल्या आहेत.
आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा
मुंबई येथील मालाड परिसरातील एका महिलेने ऑनलाईन पद्धतीने यम्मो कंपनीचं आईस्क्रीम मागवले होते. तिने ते आईस्क्रीम कोन खायला सुरुवात करताच तिला त्यामध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला. आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा बगताच महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काही वेळ तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही.
मात्र, त्यांना सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ मलाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मालाड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मालाड पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी अवयव फॉरेन्सिककडे पाठवला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.