पाटस : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला दौंड मध्ये चांगली लोकप्रियता मिळताना दिसत आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौंड विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढली आहे. पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत तात्या शितोळे यांनी ही आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केल्याची माहिती मिळत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दिला. आगामी विधानसभा ही भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासाठी चांगलीच अडचणीची ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कसल्याही परिस्थितीमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघ खेचून आणायचा निर्धार केला आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची चांगलीच अडचण होणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभेसाठी दौंड मधून सातशे इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे आले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी 23 सप्टेंबर रोजी पाटस येथील कालकथित भंते तिसावरो उर्फ बाबकगपानसरे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रशांत शितोळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असुन ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यात मतांची आघाडी मिळाली यामध्ये प्रशांत शितोळे यांचा सिंहाचा वाटा आहे.
तसेच कोरोना महामारीच्या काळात पाटस परिसरातील वंचित आणि दुर्बल घटक, गोरगरिबांना धान्य वाटप केले. नाभिक बांधवांनाही आर्थिक मदतीचा हात दिला होता. राजकीय कामाबरोबरु ते सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषद पाटस गटात अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद परिसरातील शाळा, वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांची दुरुस्ती , ओढ्या नाल्यांवरील पुलांची बांधकामे असे अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. शितोळे यांचा दौंड तालुक्यात जनसंपर्क दांडगा असुन प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे.
दौंड तालुक्यात नामांकित सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, बिगर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे केली आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुकांची यादी चांगलीच वाढली असून पक्ष श्रेष्ठींचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.