-संतोष पवार
पळसदेव : विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी शाळेतल्या आठवणी कायमच्या मनात घर करून राहतात, याचा प्रत्यय पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात रविवारी (दि. 18) ऑगस्ट रोजी आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात आला.
पळसनाथ विद्यालयात सन 2008-09 वर्षातील इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेणारे जवळपास 78 माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते. ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ‘ उक्तीप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. तब्बल 15 वर्षानंतर भेटलेले मित्र – मैत्रिणींनी आपली विचारपूस करून अनेक शालेय आठवणी जागृत करून सुसंवाद साधला.
स्नेहमेळाव्यासाठी विद्यालयातील माजी शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर मुख्याध्यपकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवुन आणल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसुन येते होते. ऋणानुबंध आणि कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयाच्या 2008/09 वर्षीच्या 10 वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आठ डायस विद्यालयास सप्रेम भेट दिले. स्नेहमेळाव्या निमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य कालिदास गोडगे होते. सुत्रसंचालन वैभव काळे व सुनिल बांडे यांनी केले तर विष्णू फासे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन शैक्षणिक वर्ष 2008 / 09 च्या 10 वी बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले.