पुणे : पुण्यातील हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष आमदार गंगाधर बधे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार बाबर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबर यांनी पाठिंबा जाहीर करण्याबद्दल सांगितले आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रामुख्याने लढत होत असताना हडपसरच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडलेली दिसून येत आहे.
यावेळी बोलताना महादेव बाबर म्हणाले की, मतदारसंघांमध्ये मला मानणारा शिवसैनिक व मतदार वर्ग मोठा आहे. मी केलेली विकास कामे आणि मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून मतदार संघामध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेले आंदोलन यामुळे सार्वजनिक हितांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यासोबत गंगाधर बधे यांना सुद्धा शिवसेने सोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.