सासवड : पुरंदर हवेली मतदारसंघातील विविध प्रश्न तसेच वाड्या वस्त्यांच्या समावेशाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुरंदर हवेलीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
त्यानुसार आज याबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गुंजवणी, फुरसुंगी देवाची नगरपालिका, समाविष्ट गावांचा कर, पुरंदर आयटी पार्क, पुरंदर उपसा योजना, अशा विविध विषयावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विजय शिवतारे म्हणाले, पुरंदर तालुक्यातील वाल्हे व राख परिसरातील वाड्या वस्त्या यांचा समावेश असलेल्या जलवाहिनीचे मूळ आरेखन जलसंपदा विभागाने तांत्रिक मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवावे. भोर, वेल्हा येथील वागणी, वाजेगर व शिवगंगा खोऱ्यातील प्रस्तावित उपसा सिंचन योजनांना राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळताच गुंजवणी प्रकल्पाच्या 1782 कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला कॅबिनेट मान्यता देईल, असे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले, वीर धरणातून विसर्ग होऊन नीरा नदी पात्राद्वारे वाहणारे अतिरिक्त पाणी पुरंदर तालुक्यातील राजुरी, रिसेपिसे, नायगाव, पांडेश्वर, रोमनवाडी, मावडी पिंपरी आणि बारामतीच्या जिरायत भागातील 29 गावांना देण्यासाठी प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पंप व अन्य दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंजूर 56 कोटीची कामे निविदा काढून तत्काळ मार्गी लावावीत, असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले.