उरुळी कांचन : भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणारे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील भाजपचे माजी हवेली तालुकाध्यक्ष अशोक दलिचंद राठोड (वय-72) यांचे आज बुधवारी (ता.17) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. जुन्या पिढीतील एकनिष्ठ नेता हरपल्याने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अशोक राठोड यांनी मागील काही दिवसांपासून दमा आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अशोक राठोड यांची बुधवारी पहाटे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, 5 पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अशोक राठोड यांनी भारतीय जनता पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी एकनिष्ठपणे कार्य केले आहे. त्यांनी सन 1989 ते 1993 या कालावधीत भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पद भूषविले आहे. सन 1990 साली हवेली तालुक्यात रामरथ यात्रा आली होती. तेव्हा त्या यात्रेची सर्व जबाबदारी राठोड यांनी चांगली पार पाडली होती. रामजन्मभूमी आंदोलनातही ते सक्रीय सहभागी होते. त्यांनी बरेच वर्ष उरुळी कांचन जैन संघटनेचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी उरुळी कांचनच्या नागरिकांच्या हितासाठी सर्वात प्रथम स्वस्त धान्य दुकान सुरु केले होते. दरम्यान, त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अशोक राठोड यांच्या पार्थिवावर उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत आज बुधवारी (ता.17) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.