संदीप टुले
केडगाव, (पुणे) : पुणे जिल्हा भाजपचे दोनवेळा जिल्हाध्यक्ष राहिलेले नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे दौंडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मोठे बळ मिळणार आहे. जिल्ह्यात ताकवणे यांच्या प्रवेशाने भाजपला जोरदार झटका बसला आहे.
बारामतीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रतिष्ठेची लढत होत असली, तरी शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार खरी अशीच लढत मानली जात आहे. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असून खासदार शरद पवार बारामतीत ठाण मांडून आहेत.
शरद पवार यांनी बारामती दौऱ्यात पुणे जिल्हा भाजप माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या १५ तारखेला प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या संदर्भात ताकवणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
कोण आहेत नामदेव ताकवणे?
नामदेव ताकवणे हे जनसंघाचे दौंडचे माजी आमदार राजाराम ताकवणे यांचे सुपुत्र आहेत. ताकवणे यांच्या तीन पिढ्या या भाजप व आरएसएससोबत राहिलेल्या आहेत. ताकवणे यांनी भीमा पाटस सहकार साखर कारखान्याचा ५०० कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. गेले कित्येक वर्ष त्यांनी दौंड तालुक्यातील भाजपचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला होता.
२०१४ मध्ये विधानसभेचे उमेदवार म्हणून त्याचं नाव जवळपास निश्चित झाले होतं. मात्र, ऐनवेळी हा मतदार संघ रासपाच्या वाटेला गेल्यामुळे त्यांची उमेदवारी मागे पडली. त्यानंतरही गेली दहा वर्ष ते भाजप पक्ष वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. दौंड तालुक्यात ताकवणे यांच्यामुळे सुप्रिया सुळे यांना मोठे बळ मिळणार आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि आमदार राहुल कुल यांना जोरदार झटका दिला आहे.
भाजपमधील नेत्यांनी भ्रष्टाचारी लोकांना साथ दिली. भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार झाला. मी पुरावे देऊनही भाजपने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे आगामी काळात भीमा पाटस कारखान्यात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात शरद पवार हे मदत करणार आहेत. तसा शब्द त्यांनी दिल्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहे.
नामदेव ताकवणे, माजी जिल्हाध्यक्ष पुणे