पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात पहाडी पोपट विक्री करणाऱ्यांना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पहाडी पोपट बाळगणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत प्रतिबंधित असतानाही कोथरुड भागात तिघेजण पहाडी पोपट विक्री करत होते. वन विभागाने त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करून आरोपीना अटक केली आहे. पियूष दत्तात्रय पासलकर (वय २१, रा. कर्वेनगर), यश रमेश कानगुडे (वय २१), सौरभ कोडिंबा झोरे (वय १९, दोघे रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्यातील पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात पासलकर, कानगुडे, झोरे पहाडी पोपट (ॲलेक्झांड्रियन) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला रविवारी मिळाली. त्या माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ, वनरक्षक डाके आणि पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी साताऱ्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सहकार्य केले.
दरम्यान, पहाडी पोपट बाळगणे तसेच विक्री करणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत प्रतिबंधित आहे. पहाडी पोपट बाळगणे, विक्री करणे, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद सरकारची आहे. असं असतानाही पुणे शहरात पहाडी पोपट विकणे सुरूच आहे.