पुणे : मराठी भाषा बोलण्यास नकार दिलेल्या परप्रांतीय मेडिकल दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण करीत त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना घडली होती. ही घटना गुरुवारी (दि. १८ ) सायंकाळी धानोरीतील एका मेडिकलमध्ये घडली होती. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पाटील (वय-४०) आणि त्याचे इतर ५ ते ६ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत यश गोकुळ छल्लानी (वय-२५, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश हे मेडिकलमध्ये असताना मनसेचे गणेश पाटील आणि त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. महाराष्ट्रात राहतोस तुला मराठी यायलाच पाहिजे, असं बोलून त्यांना दुकानाच्या बाहेर ओढून त्यांच्या अंगावर शाई टाकून माफी मागण्यास लावले. या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करून फिर्यादी यांची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.