पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या बायकोला वेश्या व्यवसाया करण्यास भाग पडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासऱ्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सावत्र सासऱ्यानेही पिडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 8 मार्च 2022 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत कासारवाडी येथे घडली आहे. या घटनने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत 32 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिडित महिलेचा पती व सावत्र सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि सावत्र सासरे यांनी फिर्यादी यांना एक अॅप त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर पिडित महिलेच्या मोबाइलवर एका ग्राहकाने संपर्क केला. त्यावेळी आरोपीने पिडित महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी जाण्यास सांगितले.
त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला. पिडित महिलेने आरोपींना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली. तसेच आरोपी सावत्र सासरा यानेही पिडित महिलेच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.