पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांचा विवाह झाला़. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. दोघे वेगवेगळे राहु लागले. त्यानंतर पुन्हा त्यांचा एकमेकांशी संपर्क होऊन पुन्हा लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने पुन्हा शारीरीक जवळीक साधली. त्यानंतर आता त्याने लग्नास नकार दिला.
त्यावर ३१ वर्षाच्या महिलेने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून अत्याचार केल्याची खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३२ वर्षाच्या तिच्या पूर्वपतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ ऑगस्ट २०२४ ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा खासगी नोकरी करत आहे. फिर्यादीबरोबर त्याचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात कुरबुरी सुरु होत्या. त्यातूनच ते वेगळे राहू लागले. जुलै २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोघे जण वेगवेगळे राहत होते. वर्षभरानंतर त्यांचा एकमेकांशी पुन्हा संपर्क झाला. त्याने पुन्हा लग्न करतो, असे फिर्यादीला वचन दिले.
तिचा विश्वास संपादन करुन तिच्यासोबत पुन्हा जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने आता पुन्हा लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर करत आहेत.