पुणे : शहरात महिला, मुली सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून, तिचे तोंड दाबून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे तर भर रस्त्यात तिचे कपडे फाडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच कोंढवा परिसरात उघडकीला आला आहे. कोंढवा पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
हा प्रकार मंगळवारी (ता. २०) रात्री आठच्या सुमारास महंमदवाडी येथील विबग्योर स्कूलच्या समोर घडला. याबाबत २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन भारतलाल रामप्रसाद कुलदीप वर्मा (वय-१९, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मंगळवारी रात्री विबग्योर स्कूलच्या समोरील रस्त्यावरुन पायी जात होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी थांबला होता. त्याने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.