पुणे : पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या मित्रावर विस्वास ठेवला त्याच मित्राने अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला गर्भवती ठेवले, त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. ही घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याप्रकरणी 17 वर्षाच्या मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रणव सुनील पवार (रा. आनंदनगर, महंमदवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरु होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रणव पवार आणि पीडित मुलगी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी मुलाने मुलीसोबत मैत्री केली. तसेच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन असल्याचा आरोपीने गैरफायदा घेत तिला राहत्या घरी बोलावून घेतले. मुलगी घरी आल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तसेच वारंवार तिच्यासोबत बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये पीडित मुलगी गरोदर राहिली. मुलीने याबाबत आरोपीला सांगितले असता त्याने तिला जबरदस्तीने गोळ्या देवून तिचा गर्भपात केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.