पुणे : जेईई आणि आयआयटी परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या कडूस (ता.खेड) येथील दक्षणा फाउंडेशनमधील 550 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर 29 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामधील चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यातून जेईई आणि आयआयटी अशा वेगवेगळ्या पूर्वपरीक्षांच्या तयारी अभ्यासक्रमासाठी येथे 550 विद्यार्थी निवासी आहेत. शुक्रवारी (दि.19) रात्री बटाटा भाजी, चपाती, डाळ-भात असे जेवण तयार करण्यात आले होते. हे जेवण केल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे
शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने उपचारासाठी त्यांना कडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणण्यात येत असून यामध्ये विद्यार्थ्यांनींचा सुद्धा सहभाग आहे.
विषबाधेचा 29 विद्यार्थ्यांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यापैकी 22 मुले आणि 7 मुली असे 29 विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता.खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 4 विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली आहे. तर 2 विद्यार्थ्यांना वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. विषबाधा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
या विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ कौस्तुभ गरड, डॉ मयुरी मालाविया, अल्त्ताफ पठाण, अर्चना धोलवड, संध्याराणी हजारे, अर्चना छानवाल, वर्षा गायकवाड, मुख्तार शेख,आशा नवगिरे, धनंजय घोसाळकर, माधुरी गोरडे,संगीता पिंगळे, वर्षा अनंदे,दीपक शेलार यांनी उपचार केले.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह पोलीस टीमने विद्यार्थ्यांची विचारपूस केली. अन्नाचे नमुने घेत ते तत्काळ तपासणीसाठी पुढे पाठविण्याचे आदेश डीवायएसपी सुदर्शन पाटील यांनी दिले आहेत.