लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पाठोपाठ इंधन माफिया आता सातारा जिल्ह्यात सक्रीय झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. इंधन माफिया एका टँकरमधून डिझेल चोरी करतानाचा व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. या व्हिडिओत टँकरमधून तिघेजण बिनधास्तपणे डिझेल चोरी करताना आढळून आले. यामुळे इंधन माफिया आता फक्त हवेलीत नव्हे, तर याचे लोन सातारा जिल्ह्यात पसरल्याचे उघड झाले आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) येथे हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल प्रा. लिमिटेड या इंधनाच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून पश्चिम महाराष्ट्रात इंधनाचा टँकरच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. मागील काही दिवसापूर्वी इंडियन ऑईल प्रा. लिमिटेड या कंपनीतून टँकर (क्र. एम एच 12, ९९३७) इंधन भरून साताऱ्याच्या दिशेकडे चालला होता.
दरम्यान, लोणंद वरून साताऱ्याकडे जात असताना चालकाने टँकर आडबाजूला घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी एक महिला व पुरुष आले. त्या तिघांनी टँकरमधून 20 लिटरचे 4 ते 5 कॅन भरून इंधन काढले. या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल प्रा. लिमिटेडचे अधिकारी सुभाष रक्षीत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलै २०२३ ला एचपी कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडत त्यातून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या इंधन चोरी प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी बड्या इंधन माफियासह सहा जणांना अटक केली होती.
दरम्यान, हा बडा इंधन माफिया तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा पूर्व हवेलीतील हडपसर, लोणी काळभोर, यवतसह दौंड भागात ‘अॅक्टिव्ह’ झाला असून, आता वाहनांमधील इंधन चोरी करण्यास सुरुवात केली. याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी पोलिसांचे मात्र, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ हे धोरण असल्याने इंधन माफियांना जणू मोकळे रानच मिळाले आहे.
इंधन माफियांवर कारवाई कधी? नागरिकांचा प्रश्न
आपापल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले असले तरी, अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. जिल्ह्यात सध्या इंधन माफिया राजरोसपणे इंधन चोरी करत आहे. अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात? पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे इंधन माफियांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पेट्रोल पंप मालकांना मोठा आर्थिक फटका
कंपनीत टँकरमधून मोजमाप करून इंधन भरून दिले जाते. मात्र, पेट्रोल पंप मालकांना मागविल्यापेक्षा कमी इंधन मिळत असल्याने खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. इंधन चोरीमुळे त्यांना स्वत:च्या खिशातून कामगारांची पगार द्यावी लागत आहे. तर इंधन चोरीचे व्हिडिओ असतानादेखील इंधन कंपनी कारवाई करीत नसल्याने इंधन माफिया व कंपनीच्या आर्थिक लागेबंध असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.