पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर दिसून येत आहे. अशातच शहरात शनिवारी सकाळी पडलेल्या दाट धुक्याचा फटका हवाई प्रवासी वाहतुकीला बसला आहे. तब्बल 22 विमानांच्या उड्डाणांना उशीर झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
शनिवारी सकाळी शहरभरात दाट धुके पसरले होते. त्यामुळे पुणे विमानतळावरील दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे सकाळी 6 ते दुपारी 12 दरम्यान 22 विमानांना याचा फटका बसला आहे. धुक्क्यामुळे अर्ध्या तासापासून ते तीन तासांपर्यंत विमानांच्या उड्डाणाला उशीर झाल्याचे दिसून आले. दिल्लीनंतर बेंगळुरु, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चैन्नई, बॅंकॉंक या शहरांसाठी जाणा-या विमानांना उशीर झाला. पुण्यात येणारे एक विमान सध्याच्या दाट धुक्क्यामुळे पुणे विमानतळावर उतरु शकले नाही त्यामुळे ते दुस-या शहराकडे वळवण्यात आले.
शहरात दाट धुके पसरल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. काही प्रवाशांच्या महत्त्वाच्या बैठका होत्या तर काही कार्यालयास पोहचण्यास उशीर झाला.