पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेकडे पाहून डोळा मारला. तसेच फ्लाईंग किस करुन अश्लील हातवारे केले. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला शिवीगाळ व बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे.
हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे १३ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३१ वर्षांच्या महिलेने बुधवारी (ता. २०) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रशांत वणवे (वय-४०, रा. हडपसर) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दरम्यान, १३ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महिला रस्त्याने जात असताना आरोपी गल्लीत उभा होता. आरोपीने महिलेला पाहून डोळा मारला. तसेच फ्लाईंग किस करुन अश्लील हातवारे केले. या प्रकाराबाबत महिलेने पतीला सांगितले. त्यानंतर संबंधित महिला आणि तिचे पती याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी प्रशांत वणवे व त्याच्या पत्नीने फिर्य़ादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली.
या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.