भिगवण: पुण्यातील रील स्टारसह दोन मुलींना ५ ते ६ जणांच्या टोळक्याने भिगवण पोलिसांच्या समोरच शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील सागर हॉटेलच्या समोर रविवारी (ता.4) पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारस घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्याऐवजी पीडितांनाच चक्क ५ ते ६ तास ताटकळत पोलीस ठाण्यात बसवले आहे. तसेच थातूरमातूर कारवाई दाखविण्यासाठी केवळ दोघांच्या विरोधात एनसीआर दाखल केल्याचा आरोप नीता सोनवणे यांनी केला आहे.
दरम्यान, भिगवण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. किरकोळ घटना समजून या गंभीर गुन्ह्याकडे त्यांनी ज्या प्रकारे कानाडोळा केला आहे, त्यावरून या प्रकरणाला त्यांनी पाठबळ दिले आहे की काय? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. त्यामुळे भिगवण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
नीता शांताराम सोनवणे (वय-२६, रा.हडपसर, शिंदेवस्ती, ता.हवेली, जिल्हा.पुणे) व त्यांच्या एका सहकारी तरुणीला मारहाण झाली आहे. तर संतोष दिलीप कदम (वय -26,रा. भिगवण स्टेशन,ता.इंदापूर, जि.पुणे) व एका अनोळखी व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीता सोनवणे या एक रील स्टार आहेत. सोनवणे या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बार्शी (जि. सोलापूर) येथे गेल्या होत्या. तेथील काम आटोपून सोनवणे या पुण्याच्या दिशेने माघारी घरी निघाल्या होत्या. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना सोनवणे व त्यांचे सहकारी भिगवण (ता. इंदापूर) येथील सागर हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी रविवारी (ता.4) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास थांबले होते. चहा घेऊन झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक सुरु झाली. यावेळी थोडी धक्काबुक्की देखील झाली.
सदर घटनास्थळी भिगवण पोलीस ठाण्याचा एक पोलीस, होमगार्ड व काही टवाळखोर तरुण तिथे उपस्थित होते. रील स्टारच्या सहकाऱ्यांमध्ये झालेली बाचाबाची ऐकून ते तिथे आले. त्यांनी वाद मिटवणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना दमदाटी करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आरोपींनी गाडीत घुसून लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून ‛चला यांना उचलून घेऊ जाऊ’ अशा प्रकारची धमकी दिली.
View this post on Instagram
धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार भिगवण पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या समोर होत होता. मात्र, भिगवण पोलिसांकडून महिलांना न्याय मिळण्याऐवजी चोर सोडून संन्याशालाच फाशी दिली जावी, असा न्याय निवाडा केला. त्या टवाळखोर मुलांना अटक करण्याऐवजी हवालदाराने त्यांना सोडून देऊन फिर्यादी महिलेला आरोपी सारखी वागणूक देत भिगवण पोलीस ठाण्यात नेले. फिर्यादी महिला आरोपींनाही गाडीत घ्या, असे म्हणत असतानाही त्याकडे संबंधित पोलिसाने कानाडोळा केला.
दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्भय पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देणे, हे पोलिसांचे काम आहे. मात्र, भिगवण पोलीस ठाण्यात चक्क पिडीतेलाच ५ ते ६ तास थांबवून आरोपीसारखी वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे भिगवण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात २१ व्या शतकातही महिला सुरक्षित आहेत की नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
View this post on Instagram
पोलिस हवालदारासमोरच लाकडी बांबूने मारहाण
भिगवण पोलीस ठाण्याच्या हवालदारासमोर टवाळखोरांकडून फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीला गाडीत घुसून लाकडी बांबूने हातापायावर मारहाण करण्यात येत होती. तसेच टवाळखोरांनी गाडीही फोडली. मात्र, संबंधित हवालदाराने कायद्याचे रक्षक म्हणून महिलांना मदत करायला हवी होती. मदत तर सोडाच, साधे टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली.
केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल
सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे माहिती असताना आणि त्यात पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने, केवळ फिर्यादी यांचे मत भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी ऐकून घेतले. मात्र, कोणत्याही प्रकारची कारवाई न करता साधा अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे महिलेवरती हा एक प्रकारे अन्याय केला असून चोरावर मोर अशा प्रकारचा न्याय त्यांनी दिला आहे. सदरील प्रकरणांमध्ये पाच ते सहा जण आरोपी असून फक्त दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करून तीन ते चार जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– नीता सोनवणे ( रील स्टार पुणे)नीता सोनवणे यांना सदर घटनेच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– विनोद महांगडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे)