पुणे: राज्य महामार्ग क्र.५० हा पुणे व नाशिक या दोन प्रमूख प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात छोट्या वाहनांपासून ते अगदी अवजड वाहने धावतात. त्यामुळे प्रचंड वर्दळीचा असणाऱ्या या मार्गावर आता आज (३ जून) पासुन टोल दरवाढ होणार असल्यामुळे वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. टोलवर नव्या दराने टोल वसुली केली जाणार असल्यामुळे वाहन चालक, मालक यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या टोल नाक्यावर मोटार, जीप व हलक्या वाहनांना पूर्वी १०५ रुपये टोल आकारला जात होता. त्यामध्ये पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तीन तारखेपासून ११० रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी १६५ रुपये टोलसाठी मोजावे लागतील. हलक्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनास १७५ रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी २६५ रुपये, ट्रक व बस यासाठी ३७० रुपये तर दुहेरी वाहतुकीसाठी ५५५ रुपये मोजावे लागतील. बांधकाम करणारे किंवा खोदकाम करणे या वाहनासाठी ५८० रुपये, तर अवजड वाहने यांसाठी आता ७०५ रुपये टोल भरावा लगणार आहे. स्थानिक खासगी वाहनांसाठी ३४० रुपयांचा मासिक पास देण्यात येणार आहे, अशी माहिती चाळकवाडी टोल कलेक्शन एजन्सी प्रतिनिधी सागर पवार यांनी दिली.