पुणे: कोथरुडमध्ये दुचाकी चोरताना दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांनी पकडले होते. पोलिसांच्या या तत्परतेमुळे संपूर्ण भारतात बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव उधळला गेल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) कोथरुड पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना दहा लाखांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
एनआयएचे अधिकारी इंगवले आणि पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया आदी उपस्थित होते. कोथरुड पोलीस ठाण्यातील अमोल नजन, प्रदीप चव्हाण, बाला रफिक शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक नीलीमा पवार यांना यावेळी गौरविण्यात आले.
जुलै २०२३ मध्ये पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आमल यांना अटक करण्यात आली होती. आरोपी साकी, खान आणि आमल कोंढव्यात वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांचा बंदी घातलेल्या अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात समोर आले होते. तसेच राजस्थानात चितोड परिसरात त्यांच्याविरुद्ध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. तपासादरम्यान हे तिघे दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते.
महाराष्ट्रासह गोवा आणि तेलंगणात आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे साेपविण्यात आले होते. दहशतवाद्यांकडे पिस्तूल, स्फोटके सापडले होते. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोंढव्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी दुर्गम भागात लपण्याची जागा शोधली होती. तसेच पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण देखील केले होते.