– विजय लोखंडे
वाघोली : अष्टापूर (ता.हवेली) येथील खोलशेत वस्तीतील साटूबाई नगर परिसरात सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यावेळी विद्युत खांबाला खाजगी लोखंडी तारीचे कुंपन चिकटल्याने त्या तारेच्या कुंपणामध्ये विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे वीजेच्या धक्क्याने युवराज रुपनर, (रा. अष्टापूर) यांच्या मालकीच्या पाच शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 शेळ्या व 2 शेळ्यांची पिल्ले होती.
या घटनेची माहिती मिळताच अष्टापूरच्या सरपंच पुष्पा कोतवाल यांचे पती सुरेश कोतवाल, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अष्टापूरचे माजी सरपंच रामदास हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते विकास कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतवाल यांनी मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांची पाहणी केली. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी शेळी मालक युवराज रुपनर, गणेश रुपनर, रामदास कुंजीर, दत्तात्रय कोतवाल, नितीन कोतवाल, किरण कोतवाल, विक्रम कोतवाल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनास्थळी महावितरणाचे कनिष्ठ अभियंता रमेश वायकर यांच्यासह वीज अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने शेळी मालक यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी वीज वितरण कंपनी प्रयत्न करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.
वीजेच्या धक्क्याने 5 शेळी मृत्युमुखी पडल्याने शेळी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीने देऊन शेळी मालकाला मदत करावी. तसेच वीज वितरण कंपनीने आष्टापूर गावात सर्व वीजेचे खांब व वीज वाहक तारा पाहणी करुन तपासणी करावी.
– रामदास कोतवाल, जिल्हाध्यक्ष- रयत शेतकरी संघटना तथा माजी सरपंच-आष्टापूर