पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलीस आणि गुन्हे शाखेचे दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई निगडीतील अंकुश चौकात करण्यात आली. यामधील तीन आरोपींनी गोवा येथून पासपोर्ट काढल्याचे उघड झाले आहे. रातुल शील्फोन बरूआ (वय २८), राणा नंदन बरूआ (वय २५, सर्व रा. चित्तगोंग, बांगलादेश), रॉकी सामोर बरूआ (वय २८), जयधन अमीरोन बरूआ (वय २८), अंकुर सुसेन बरूआ (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर जिकू दास ऊर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे) हा फरार आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस शिपाई सुयोग लांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.