युनूस तांबोळी
पुणे : चंदेरी दुनिया आता मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर दिसू लागली आहे. ग्रामीण भागात तर फिल्मी दुनियेचा परिणाम वेब सीरीज आणि लघुपट निर्मितीकडे होऊ लागला आहे. त्यातून वेगवेगळे विषय घेऊन लघुपटातून समाजात जनजागृती करण्याकडे तरूणाई वळताना दिसू लागली आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील दिग्दर्शक भरत रोडे यांनी ‘फिटमफाट’ या लघुपटातून मागासलेल्या समाजात शिक्षणाची क्रांती घडविण्याचे काम केले आहे. त्यांचा हा लघुपट ‘युट्यूब’वर पाहावयास मिळणार आहे.
समाजात आजही शिक्षणाविषयी मागासलेपणा दिसून येतो. त्यातून काही समाजात आजही विषमतेच्या दरीमुळे शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ऊसतोडणी कामगार, मेंढपाळ, मरीआई, बहिरूपी, पिंगळा, भुतेबाबा, नंदीवाले अशा समाजात अनेक वंचित घटकातील कामगार, लोककलावंत पाहावयास मिळतात. भटकंतीमुळे यांच्या मुलांना आजही शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
साखर कारखान्यांनी आज साखर शाळा उघडल्या असल्या तरी देखील परिस्थितीमुळे ऊसतोडणी कामगारांची मुले आजही ऊसाच्या शेतावर तोडणी करताना दिसतात. सरकारने सक्तीचे शिक्षण हा कायदा केला असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा समाज हा शिक्षणापासून वंचित असल्याचे पहावयास मिळते. या मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी ‘फिटमफाट’ हा लघुपट तयार करण्यात आला.
एक सुशिक्षित पिढी घडविण्यासाठी काय करू शकतो, हे या लघुपटाचे खास वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते. निर्माता व लेखक दत्तात्रेय वाळुंज यांनी नाम्या (अनमोल थोरात) या लघुपटातील विद्यार्थ्यांला शिक्षक (सचिन शिंदे) शेवटपर्यत शिक्षणासाठी गोडी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. यासाठी दिग्दर्शक भरत रोडे यांनी शिक्षणासाठी जनजागृती करण्यावर भर दिला आहे.
यामध्ये प्रकाश वाघमारे, गुजाभाऊ ताम्हाणे, कल्पना जगताप, कल्पना ढगे, वैशाली माने, संपत थोरात, अवधुत देशमुख या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनयाची जोड दिली आहे. अमोल विधाटे यांनी कॅमेरामन म्हणून सहकार्य केले आहे.
…तर समाजात चमकणारे विद्यार्थी घडतील
वंचित व समाजातील मागासलेपणामुळे आजही या समाजातील मुळे शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना शिक्षणाच्या कायद्यातून आणून शिक्षणाचे धडे दिले तर या समाजात देखील वेगवेगळ्या क्षेत्रात चमकणारे विद्यार्थी घडतील. त्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी. तरच या समाजात शिक्षणातून काही चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही.
– दत्तात्रेय वाळुंज, निर्माता व लेखक, ‘फिटमफाट’ लघुपट