-बापू मुळीक
सासवड : 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी पूर्ण झाली आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक सुमित कुमार, खर्च निरीक्षक समन्वयक अधिकारी गणेश सस्ते आणि सहाय्यक खर्च निरीक्षक अधिकारी सुनील परदेशी तथा पुरंदर विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली 16 उमेदवारांची प्रथम खर्च तपासणी (दि. 10 नोव्हेंबर) रोजी पुरंदर मतदार संघातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष पंचायत समिती, मीटिंग हॉल येथे करण्यात आली. यावेळी खर्च ताळमेळ प्रक्रिये दरम्यान दोन उमेदवारांच्या खर्चात किरकोळ तफावत आढळून आले. सदर दोन उमेदवारांना खर्च निरीक्षक यांनी दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत, अशी तफावत पुढे होऊ नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी उमेदवार दैनिक खर्च ताळमेळ पथक प्रमुख वंदना आवटे, उमेदवार दैनिक खर्च ताळमेळ अन्य सदस्य आणि उमेदवार यांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयांच्या खर्चाची दुसरी तपासणी गुरुवारी 14 नोव्हेंबर 2024 रोजी व तिसरी तपासणी सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले.