पुणे : पुण्यातील दोन पोलीस शिपायांना निलंबित केल्याची बातमी समोर आली आहे. रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्या विक्रेत्याकडून 14 हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही 23 बेडशीट घेणाऱ्या दोन पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.
पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित केलेल्या पोलीसांची नावे आहेत.
निलंबित केलेले दोन्ही पोलीस हे विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. हा प्रकार 17 सप्टेंबर रोजी विमान नगर परिसरात घडला होता. या प्रकारानंतर वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी या विषयाबाबत तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई केलेली नव्हती. त्यावेळी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील दत्त मंदिर चौकामध्ये काहीजण बेडशीट विक्री करण्यासाठी थांबले होते. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर आणि संजय आसवले त्याठिकाणी आले. त्यावेळी तुम्ही इथे का थांबलात? इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागणार असे त्या बेडशीट विक्री करणा-यास सांगून त्यांच्याकडील 60 बेडशीट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर त्या बेडशीट विक्रेत्यांकडून त्यांनी 14 हजार रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर बेडशीट विक्रेते अल्थमेश आणि त्यांच्या मित्रांनी बेडशीटची मागणी केल्यानंतर पोलीसांनी 60 बेडशीटपैकी 37 बेडशीट परत दिले. 23 बेडशीट स्वत:कडे ठेवून घेतले होते.
याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी (दि.18 सप्टेंबर) रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी त्या जागेवरील सीसीटीव्ही पाहून सर्वांचे जाब जबाब नोंदवून घेतले होते. परंतु तरीही विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नसल्यामुळे 30 सप्टेंबर रोजी अमोल निकाळजे यांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानंतर पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी कारवाई करत त्या दोन्ही पोलीसांना निलंबित केले आहे.